Monday, 4 May 2020

Various raises in Maharashtra ( uthav) in Marathi महाराष्ट्रातील उठाव

Various raises in Maharashtra ( uthav) महाराष्ट्रातील उठाव


येथे आपण महाराष्ट्रातील इंग्रजी अमदनीतील उठावांची सविस्तर माहिती घेऊ. यामुळे राष्ट्रीय आंदोलन किंवा चळवळीच्या पूर्वी व वेगळ्या स्वरूपात झालेल्या विविध उठावांनी स्वातंत्र्यासाठी कसा संघर्ष केला हे कळू शकेल. 
Uthav
उठाव

महाराष्ट्रातील विविध उठाव Various raises in Maharashtra ( uthav)

१७ नोव्हेंबर १८१७ रोजी इंग्रजी पलटणी पुणे शहरात घुसल्या. एलफिन्स्टनने भेदनीती वापरली. एलफिन्स्टनला फितूर झालेल्या घरभेदी बाळाजीपंत नातूने त्याचदिवशी भगवा झेंडा उतरवून त्याऐवजी साहेबाचा बावटा फडकवला. ११ एप्रिल १८१८ रोजी इंग्रजांनी प्रतापसिंह महाराजांना सातारच्या गादीवर बसविले. प्रत्यक्षात कारभाराची सूत्रे कॅप्टन जेम्स ग्रँट डफ या रेसिडेंट व त्याचा सहायक बाळाजी पंत नातू यांच्या हातात होती. इ. स. १८१८ मध्ये महाराष्ट्रात पेशवाई संपली. ब्रिटिशांची सत्ता सुरू झाली. महाराष्ट्राने एक युगान्त केला व नवीन आधुनिक युगाची सुरुवात पाहिली. 
   यशवंतराव शिर्के व रंगोबापूनी मराठ्यांच्या पेशवाई सत्तेला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. इ. स. १८३९ मध्ये प्रतापसिंह महाराजांना पदच्युत करण्यात आले. रंगो बापूंनी इंग्लंडमधील वृत्तपत्र व व्याख्यानातून १३ - १४ वर्ष प्रयत्न केले पण यश आले नाही. 
   १४ ऑक्टोबर १८४७ रोजी पदच्युत करण्यात आलेले महाराज काशीस निधन पावले. त्यांच्या जागी व्यसनी अप्पासाहेब आले. ते ७ एप्रिल १८४८ रोजी वारले. इंग्रजी सत्तेच्या वतीने गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीने सातारचे संस्थान खालसा केले. रंगो बापू इंग्लंडहून हताश होऊन परतले. 
   १३ मार्च १८५४ रोजी त्यांना नागपूर व झाशी संस्थाने खालसा झाली हे कळले. तसेच अनेक संस्थान प्रमुखांनी तह करार मान्य करून इंग्रजी वर्चस्व स्वीकारले. यात उल्लेखनीय संस्थानिक म्हणजे बडोद्याचे गायकवाड, कोल्हापूरचे भोसले, ग्वाल्हेरचे शिंदे, इंदूरचे होळकर, धारचे पवार तसेच जमखंडी, सांगली, मिरज, कुरुंदवाडचे पटवर्धन, भोरचे पंत सचिव, औंधचे पंतप्रतिनिधी, जनचे डफळे, अक्कलकोट व सावंतवाडीचे भोसले वगैरे छोटे मोठे संस्थानिक सरदार व जहागीरदार ब्रिटिशांचे अंकित बनले होते. 
   दुसरे बाजीराव पेशवे हे तमासगिरांचे, कलावंतीणीचे व शाहिरांचे आश्रयदाते असल्याने शाहीर परशरामाप्रमाणे सनगभाऊ, होनाजी, प्रभाकर वगैरेंना निराधार झाल्यासारखे वाटणे स्वाभाविकच होते. पेशव्याची राजधानी पुणे या शहराचे पेशवेकालीन महत्त्व गेले व प्रगती थांबली. त्याऐवजी मुंबईला महत्त्व येऊन मुंबईचा विकास सुरू झाला. पुण्यात १६२ सावकार प्रसंगी पेशव्यासही कर्ज देत. आता कोकणस्थ, चित्पावन ब्राह्मण घराण्यापैकी जोग, गद्रे, भावे, दातार, साने, भिडे, पटवर्धन, इत्यादी धनाढ्य सावकार दरिद्री झाले. पेशवाईत जुन्नर, खेड, सासवड, इंदापूर, सुपे, वाई, नाशिक यांसारखी लहान व मोठी गावे व सधन, सुखी वस्त्या वैभवहीन होऊ लागल्या. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात रेल्वेमुळे मुंबई पुणे जोडले. औद्योगिकीकरण, शैक्षणिक विकास सुरू झाला. पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी व विद्येचे माहेरघर बनले. महाराष्ट्रातील खेडीपाडी अधिकच दरिद्री होऊ लागली. 

 ( अ ) १७५७ ते १८५६ पर्यंतचे उठाव 
 भारतातील इतर प्रांतातील इंग्रजविरोधी उठावाप्रमाणे महाराष्ट्रातही या सत्तेच्या विरुद्ध अनेक उठाव झाले. एकोणिसाव्या शतकात इंग्रजांचा प्रतिकार करण्यामध्ये मुख्यत : वहाड ( विदर्भ ) येथील गोंडव भोसले, खानदेशातील भिल्ल, आदिवासी, रामोशी, कोळी, मांग याविविध जातींचे लोक व शेतकरी होते. पेशवेकाळात विविध अधिकार पदावर राहिलेली मंडळी आणि नागपूर, कोल्हापूर, सावंतवाडी येथील मराठा राजघराण्यावर निष्ठा असलेल्या उच्च समजल्या जाणाऱ्या जातीतील, कुळातील लोकांनीही इंग्रजी राजवटीचा प्रतिकार केला. हे उठाव मर्यादित स्वरूपाचे असून त्यांची शस्त्रे जुनी, शिस्तीचा अभाव, अपुरी साधने होती. मात्र शौर्य व धाडस हे गुण त्यांच्या लढ्यात प्रकर्षाने जाणवतात. शिस्तबद्ध व सुसज्ज कवायतीचे शत्रूचे सैन्य त्यांच्यापेक्षा दर्जेदार असल्याने व शासकीय यंत्रणा, पैसा, अधिकार यांच्या रेट्यामुळे उठाव करणाऱ्यांना पराभव पत्करणे नशिबी आले. तरीही एक बाब महत्त्वाची ठरते ती म्हणजे यास भिऊन त्यांनी उठाव करण्याचे बंद केले नव्हते. या लढ्यांची आपण माहिती घेऊ या. 

( १ ) रामोशींचे उठाव
 रामोशी, भिल्ल, इत्यादी जमाती दरोडा घालणे हा आपला

धर्मच समजत. त्यांचा ब्रिटिशांशी सशस्त्र संघर्ष ही बाब अटळ होती. रामोशी या जमातीपैकी भिवंडीच्या दादजीने ( उमाजी नाईकचा पिता ) ११० दरोडे घातले होते. अशी नोंद उमाजी नाईकचा चरित्रकार मॅकिन्टॉशने दिली आहे. रामोशी हे स्वतःला रामवंशी समजत, म्हणून या शब्दाची व्युत्पत्ती काही विद्वान रामवंशी व काहीजण रानवंशी म्हणजे रानात राहणारे अशी देतात. मूलतः तेलगू व कानडी परंपरेतील हे वाटतात. कानडीत ' बेरड ' ' बयादरुस ' हा उल्लेख यासाठीच येतो. निजामच्या काळात शोरापूर परिसरात त्यांचे राज्य होते. म्हणून ते ' राजा ' किंवा ' नाईक ' संज्ञा लावीत. हे मांस न खाणारे रामभक्त होत. पुण्याकडील रामोशीमध्ये चव्हाण व जाधव असे दोन भाग आढळतात. मराठीसोबत ते सांकेतिक भाषा वापरतात. उत्तर मराठेशाहीच्या कालखंडात पुणे परिसरात त्यांचे जास्त संख्येने वास्तव्य राहिले. सर्व रामोशी दरोडा हे काम करीत नसून शेती, पशुपालन, किल्ल्यांचा बंदोबस्त करणे, मोठ्या वाड्याचे पहारेकरी हे काम करून गुजारा करीत. ते शूर व विश्वासपात्र असत. त्यांना ठरावीक गावांचा महसूल घेण्याचा अधिकार असे. दुसऱ्या बाजीरावच्या काळात ताब्यातील किल्ल्याचा बंदोबस्त करणारे रामोशीच किल्ल्यावर ताबा करू लागले. 
   उमाजी नाईकचा जन्म इ. स. १७९१ मध्ये झाला. त्याचे वडील भिवंडीत ( पुरंदरच्या ईशान्येस ) राहत, उमाजी एक दरोडेखोर म्हटला, की राकट, दांडगाई करणार असा वाटू लागतो, पण प्राचार्य सदाशिव आठवलेंनी त्याचे रेखाटलेले व्यक्तिचित्र असे आहे - " एकशे बासष्ट से. मी. उंचीचा, मोठ्या डोळ्यांचा, वर्णाने लालसर असा उमाजी दिसावयास अजिबात क्रूर वाटत नव्हता. त्याचा चेहरा सौम्य व प्रसन्न वाटे. " तो केवळ अकरा वर्षांचा असताना वडील वारले. शिक्षण बंद झाले. वडीलासोबत पुरदरचा बंदोबस्त करण्याकडे त्याचे लक्ष असायचे, किल्ला सांभाळून दरोडे घालणारे रामोशी लोक असल्याने उमाजीने इ. स. १८१८ मध्ये भोर जवळच्या विंग गावी दरोडा घातला, तो पकडला जाऊन कैदेत पडला. इतरांचे पाहून तो लिहा - वाचायला शिकला. ' खंडोबा प्रसन्न ' लिहून यानंतर त्याने पत्रव्यवहारही केलेला दिसतो. या संतू हा त्या वेळी टोळीचा प्रमुख होता. इ. स. १८२४ २५ मध्ये उमाजीसह भाऊ अमृताने प्रयत्नपूर्वक भांबुर्ल्याचा इंग्रजांचा लष्करी खजिना लुटला. संतूच्या मृत्यूनंतर इ. स. १८२५ पासून उमाजी टोळीचा नाईक झाला. यावर्षी त्याने सात दरोडे व आठ ठिकाणी वाटमारी केली. पटवर्धन, निंबाळकर, इत्यादी सरदारांनाही झळ पोहोचली. त्यांच्या तक्रारीनंतर इंग्रजांनी उमाजीविरुद्ध पहिला जाहीरनामा काढला. उमाजी व पांडूजीला धरून देणारा रु. १००चे बक्षीस घोषित केले. पुढे दुसऱ्या जाहीरनाम्यानुसार उमाजीस साथ देणाऱ्यास ठार करण्याची नोंद दिली गेली. उमाजीने न भिता इंग्रजांविरोधी मोहीम चालवून जेजुरी, सासवड, परिचे, भिवरी, किकवी भागात प्रचंड लूट व गोंधळ केला. घोडदळ सज्ज केले व शिवाय १५२ चौक्या बसविल्या. 
   
   गावकरी उमाजीस साथ देत होते. पुन्हा जाहीरनामा काढून उमाजीला मदत दिली तर दंडित केले जाईल ही घोषणा झाली. ती परिणामशून्य ठरली. आता रु. १२००चे बक्षीस उमाजीला पकडणाऱ्यास ठरविले. सरकारी अहवालानुसार उमाजीजवळ आला तरी इंग्रजांना कळत नसे मात्र त्याला इंग्रजी हालचाली कळत. वाईचे व पुणेरी ब्राह्मण त्याला साथ देत. सातारचे छत्रपती नायगाव येथे घोडदळासह असून त्यांनी उमाजीस अटकाव केला नाही. तो डोंगरकपारीत राहून भिक्षुकांना दक्षिणा व दाने देई. तो स्वत : ला राजे म्हणवून घेई. गेलेले अधिकार मिळाल्याप्रमाणे वागायचा. इंग्रजांनी काट्याने काटा काढावा म्हणून रवतच्या राणोजीस हाती धरून त्याला जमीन देऊ असे आमिष दिले. तो अन्यायी होता म्हणून इंग्रजांनी त्याच्याऐवजी रोहिड्याचा रामोशी आप्पाजीला नाईकपद दिले. उमाजीने आता ब्रिटिशांना आव्हान दिले. पुण्याचा कलेक्टर एच. डी. राबर्टसन कडे इ. स. १८२७ मध्ये उमाजीने काही मागण्या केल्या. 
( १ ) कैदेतील अमृता रामोशी व विनोबा ब्राह्मणास मुक्त करा. 
( २ ) रामोशींची परंपरागत वतने परत द्या, 
 ( ३ ) पुरंदर व इतर रामोशींची वतने कायम ठेवावीत. असे न केल्यास रामोशी उठाव होणार. पुण्याच्या कलेक्टरने जाहीरनामा काढून उत्तर दिले. 
 दि. १५. १२. १८२७ चा जाहीरनामा कलमे क्र. ( १ ) रामोशी चार परगण्यात जनतेला त्रास देतात म्हणून बंदोबस्त करू. ( २ ) जनतेने रामोशांना पाठिंबा देऊ नये. ( ३ ) त्यांच्या गटात सामील व्यक्ती शरण आली तर ( वीस दिवसापर्यंत ) माफी दिली जाईल. ( ४ ) उमाजी, भुजाजी, पांडुजी, येसुजींना पकडून देणाऱ्यास ५००० रु. बक्षीस मिळेल. ( ५ ) माहिती देणाऱ्यास खास बक्षीस मिळेल. 
   उमाजीने आता ५ इंग्रजांची मुंडकी उडवून लष्करी अधिकाऱ्यास भेट दिली. इंग्रजांना ते झोंबले. उमाजीने २५ डिसेंबर १८२७ रोजी ठाणे व रत्नागिरी सुभ्यासाठी जाहीरनामा काढला. पाटील व मामलेदारांनी महसूल उमाजीस द्यावा. तसे न केल्यास परिणाम भोगण्यास सज्ज रहावे. त्याला १३ गावांचा महसूल मिळाला. त्याने सातारचे छत्रपती व कुलाबाकर आंग्रेची मदत घेतली. दंगा घडविला. इंग्रजांनी त्याची बायको, मुलांना व मुलीस पकडले. शेवटी उमाजी शरण गेला. उमाजीचे गुन्हें माफ केल्याने त्याने इंग्रजांची नोकरी पत्करली. कारण उमाजीपेक्षा ब्रिटिशांची ताकद जास्त होती. उमाजीकडे पैसा, मनुष्यबळ व शस्त्रे कमी होती. उमाजी नोकरदार बनला. त्यामुळे गुन्हे माफ झाले तर समाजात प्रतिष्ठा व राजमान्यता मिळून त्याचा त्याला फायदा घेता येईल. तर इंग्रजांनी नोकरी देऊन रोष कमी केला. रानातला वाघ अनायास शरण आला म्हणून इंग्रजांची प्रतिष्ठा वाढली व अशा एका उमाजीस ठार केले तर शेकडो जन्मतील, यामुळे नोकरी दिली होती. इ. स. १८२८ ते १८३० पर्यंत
उमाजीने नोकरी केली. पुणे, सातारा भागात त्याने शांतता टिकविली व पगारवाढ घेतली. पुणे, भोर, सातारा, फलटण भागात दरोडे वाढले. तेरा गावच्या लावून दिलेल्या भोर संस्थानच्या वसुलीवरून त्याचा संस्थानशी संघर्ष वाढला. अशात भाईचंद भीमजी प्रकरण उभे झाले. पैसा उमाजी घेतो, पुरंदर परिसरात रामोशी वर्दळ वाढली. उमाजीने माणसांची जमवाजमव केली. त्यामुळे साशंक होऊन ब्रिटिशांनी उमाजीला कैद केले. 
     इ. स. १८३० - ३१ दरम्यान कैदेतून सुटून उमाजी कन्हे पठारावर प्रकटला. त्याने व्यूहरचना केली. लहान टोळ्याकरवी दंगली सुरू केल्या. समोरासमोर लढा टाळला. गनिमी कावा वापरला. रयतेला त्रास न देता सरंजाम घेणे, पोटाला भाकर घेणे. प्रत्यक्ष इंग्रजांशी पांढरदेवच्या डोंगरात संघर्ष झाला. पुण्याचा कलेक्टर जिबनने कॅ. अलेक्झांडरने मॅकिन्टॉशवर जबाबदारी टाकली. २६ जानेवरी रोजी जाहीरनामा काढला. उमाजी व साथीदारास पकडणारास रोख रु. ५००० व २०० बीघा जमीन मिळेल. बंडातील व्यक्तीने माफी मागितली तर गुन्हेमाफी देऊ. बातमी कळवणाऱ्यास रु. २५०० चे बक्षीस व १०० बिघा जमीन देऊ. पण परिणाम झाला नाही. पुन्हा १६ फेब्रुवारी १८३१ रोजी उमाजीने जाहीरनामा काढला. युरोपियन दिसताच ठार करा. रयतेची वतने व तनखे बंद केलेले परत घेऊ. उमाजी सरकारला पाठिंबा द्या. शिपायांनी इंग्रजी हुकूम मानू नयेत नसता शिक्षा भोगावी लागेल. गावचा वसूल इंग्रजांना देऊ नका. नसता गाव उद्ध्वस्त करू. या जाहीरनाम्याचे विशेष की हा हिंदुस्थानसाठी पहिला जाहीरनामा होता. 
     यात देश व राष्ट्र एक ही संकल्पना दिसते. यात राजा, वतनदार, जमीनदार, सरदार, सामान्य रयत हिंदू - मुसलमान सर्वांचा समावेश आहे. उठावाला उमाजी धर्मकार्य ठरवितो व नंतर समस्त गडकरी नाईकांसाठी लिहितो व आवाहन करून मराठवाडा, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर भागात दंगे घडवून ब्रिटिशांना हैराण करतो. कॅ. मॅकिन्टॉशच्या मदतीला कॅ. बॉईड, कॅ. लिव्हिंगबस्टन व कॅ. ल्यूफन नेमले गेले. पुन्हा इंग्रजांनी ८ ऑगस्ट १८३१ला जाहीरनामा काढला. जो परिणामकारक ठरला. आता उमाजीला पकडण्यासाठी रु. १०, ००० / - रोख व ४०० बिघा जमीन व बातमी पुरविणारास रु. ५, ००० / - रोख व २०० बिघा जमीन देण्याचे जाहीर केले होते. उमाजीचे जुने साथीदार काळू व नाना तयार झाले. जुना शत्रू बाबूसिंग परदेशी होता. विश्वासघाताने उमाजीला पुण्याच्या मुळशीजवळ आळबस येथे आणले. उत्तोळी येथे १५ डिसेंबर १८३१ रोजी नानाने पकडून इंग्रजांच्या हवाली केले. मराठी माणसाचा इंग्रजविरोधी पहिला उठाव फसला. उमाजीला ३ फेब्रुवारी १८३४ रोजी फाशीची शिक्षा झाली. तळागाळातील एका नेत्याचा हा पहिला ब्रिटिश विरोधी लढा होय. ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यानेही प्रेरित केले होते. 

( २ ) भिल्लांचे उठाव 

   द्राविडी भाषेत ' विल्लू ' किंवा ' बिल्लु ' चा अर्थ धनुष्यबाण असा करतात असे विल्सनचे मत होय. भारतीय जमातीपैकी सर्वांत जास्त संख्येची ही जमात. याची वस्ती अरवली, विंध्य, सह्याद्री व सातपुडा पर्वत पठार भागात आहे. महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश व राजस्थान भागात हे भिल्ल राहतात. खानदेशात त्यांची जास्त वस्ती आहे. हे लोक शेती करणे, गुरे पाळणे, मासेमारी व शिकार करणे यातून उपजीविका मिळवितात. डोंगराळ भागात ते लुटमार हा मुख्य व्यवसाय करतात. भिल्ल्यांच्या बारा वेगवेगळ्या जाती आहेत. बरडा, डागची, माऊची, वसावा, तडवी स्वत : ला शुद्ध जमातीचे मानतात. काही भिल्ल रजपूत, भिल्ल कुणबी, भिल्ल मुस्लिम अशा आहेत. 
    खानदेश भागात मराठेशाहीच्या शेवटच्या काळात अराजक माजले. भिल्लांनी फायदा घेऊन इ. स. १८०३ मध्ये उठाव केला. त्याचे स्वरूप लुटमारीचे होते. यशवंतराव होळकराने बंड केले होते. त्यामुळे भिल्लांचे फावले होते. पेंढारी उठावाचे नेतृत्व एका मुस्लिम भिल्लाकडे होते. इ. स. १८१६ मधील हा उठाव तर इतका प्रखर होता की माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टने आशिया खंडात या उठावाला तोड नव्हती असे लिहून ठेवले आहे. आठ हजार भिल्लांनी इ. स. १८१८ मध्ये अचानक व एकदाच उठाव करून सातमाळा व अजंठा भाग अशांत केला. त्र्यंबकजी डेंगळे ठाण्याच्या किल्ल्यातून पळून भिल्लांच्या आश्रयी राहिला. त्यांना आर्थिक मदत व मनुष्यबळही पुरविले. 
     एलफिन्स्टनला बाजीराव मदत देत असल्याची शंका होती. ब्रिग्ज हा अधिकारी खानदेशात बंदोबस्त करीत होता. एक तर होळकरांचा पराभव व इंग्रजानी त्यांच्यावर तह लादणे व दुसरे कारण बाजीराव व साथीदार अद्याप इंग्रजांना शरण आले नव्हते. उठावाला भिऊन लोक गावे सोडू लागली होती. देवजी नाईक नंतर १८११ पासूनच वायव्य खानदेशात उठाव व अस्थिरता केली होती. एलफिन्स्टनच्या म्हणण्यानुसार प्रमुख भिल्लांना पकडून पेन्शन दिले. पकडता येत नाही म्हणून सातपुडात दडलेल्यांनी शरण आल्यास माफीची घोषणा केली. पूर्वीचे हक्क देऊ हे जाहीर केले. तरी चिल नाईकाचा प्रचंड उपद्रव चालू होता. ब्रिग्जने पकडून त्याला फाशी दिले. सातमाळ्यात शांतता झाली. इ. स. १८२० साली नेमलेल्या कॅ. इसार्टने पूर्ण बंदोबस्त केला. शंभर मैलाचा टापू अशांत होता. शेवटी महमंद दल्लाला पकडले. 
       इ. स. १८२२ मध्ये ' हीरा ' भिल्लचा उठाव मोडण्यासाठी मेजर मोरीन पूर्वी शांतता केली. हीराचा बंदोबस्त करण्यासाठी कर्नल रॉबिन्सनची नेमणूक झाली. दोन वर्षांच्या परिश्रमातून शांतता निर्माण झाली. मात्र इ. स. १८२५ साली सेवारामने उठाव केला. ८०० जणासह इंग्रजी वर्चस्वातील अंतापूर लुटले व मुरलीहार हा किल्ला बळकावला. ले. आऊटॉमने त्याला पकडून गुन्ह्यासाठी माफी दिली. जमिनीचे अधिकार परत केले. अवजारे, बी - बियाणे पुरविली. तरी पुंड्या, बुंदी व सटवा भिल्लांनी खानदेशाला त्रस्त केले. आता ले. आऊटरॅमसोबत कॅ. व्हेन व कॅ. रिग्वीही होते. त्यांनी भिल्लांवर मात केली. भिल्लांचे पुनर्वसन करण्याची योजना केली. 
     तसे बंदोबस्तासाठी खानदेशचा तीन भागाचा कारभार, रस्ते, खिंडीचा त्यांच्या हातूनच बंदोबस्त, पूर्वीच्या जमिनी परत देणे, बी - बियाणे, जनावरे, अवजारे पुरविली. भिल्लांच्या उपद्रवी कारवायावर मात करण्यासाठी ही प्रेमाची वागणूक प्रभावी ठरली होती. 

 ( ३ ) कोळ्यांचे उठाव 

12 या जमातीचे लोक सह्याद्री पर्वतात ठाणे जिल्ह्यात मुख्यत : राहत. हळूहळू गुजरातच्या कच्छचे रण ते पश्चिम घाट परिसरात ते राहू लागले. पूर्वी हे लोक वतनांचे मालक, किल्ल्यांच्या बंदोबस्ताचे काम करणारे म्हणून त्यांना मराठेशाहीत महत्त्वप्राप्त होते. ब्रिटिशांनी त्यांचे हे काम व वतने कमी करून त्याचा रोष घेतला. इ. स. १८२४ मध्ये गुजरातच्या कोळ्यांचा उठाव झाला. तो प्रभावी व पहिला उठाव ठरला. मुंबई भागाप्त नेटिव्ह इंन्फंट्रीने उठाव केला. तो उठाव ब्रिटिशांनी दडपला. रामजी भांगडिया हा कोळी अधिकारी नाराज झाला. नोकरी सोडून त्याने कोळी लोकांचे संघटन केले. कोळ्यांचे ऐक्य केले. जमिनी इंग्रजांनी घेतल्या. किल्ले व्यवस्थापन बदलले. अन्नान्न दशेमुळे रामजीने उठाव केला. शस्त्रे जमविली व इ. स. १८२८ मध्ये उठाव केला. लढा दिला. कॅ. अलेक्झांडरने दोन वर्ष लढा दिला व बंडाळी नष्ट केली. पश्चिम किनाऱ्याकडे शांतता प्रस्थापित झाली. 
    कोळ्यांनी नऊ वर्षे आतून तयारी करून पुन्हा दुसरा टप्पा गाठला. या उठावात शस्त्रशक्ती वाढविली गेली. तिकडे शांतता पाहून पुणे जिल्ह्यात संरक्षक दलात ब्रिटिशांनी कपात केली होती. इ. स. १८३९ मध्ये एकदम उठाव झाला. दुसरा बाजीराव यास पेशवेपद देऊन पुन्हा राज्य स्थापना झाली आहे. तसेच संपूर्ण राज्य कोळ्यांच्या ताब्यात आहे ह्या घोषणा होताच इंग्रजांच्या तोंडाचे पाणी पळाले. रामोशी उठाव चालू होतेच. कोळ्यांनी घोडनदीच्या सरकारी खजिना लुटण्यासाठी हल्ला केला. रोझ या असिस्टंट कलेक्टरने लगेच पुण्याचे सैन्य बोलावून लढा दिला. कोळी जमातीचे ५४ लोक पकडून शिक्षा केल्या. काहींना फाशी झाली, उठाव मोडल्यावर पाच वर्ष शांतता टिकली. 
   तिसऱ्या टप्पा आला इ. स. १८४४ मध्ये रंगू भांगडिया, बापू भांगडियाच्या उठावामुळे. पुणे, नाशिक, नगर परिसरात एकदमच उठाव झाले. पुरंदरच्या पाटलाने कोळ्यांची माहिती दिली व इ. स. १८४५ मध्ये बापू भांगडियाला पकडण्यात आले. कोळ्यांनी पाटलाला ठार केले. सातारा, पुरंदरकडेही उठाव झाले. सरकारी खजिने लुटले गेले. उमाजी नाईकच्या मुलांनी मदत दिली. नाणेघाट, मालसेज घाटावर ताबा झाला, कोकणचा मार्ग अडविला. एक वर्ष हतबल होऊन इंग्रज काही करू शकले 
नाहीत. 
   शेवटी कॅ. जेलने अभ्यासपूर्ण योजना केली. त्यांची स्थाने व दोष हेरले. तुक्या - माणक्या ( उमाजीचे पुत्र ) व इतर अनेक नेते पकडून इ. स. १८५० पर्यंत या कोळी उठावांचा कायमचा बंदोबस्त केला. 

 ( ४ ) गोंड आदिवासींचा उठाव 

   अशा उठावांपैकी आठवणीत राहणारा उठाव म्हणजे गोंड आदिवासींचा उठाव होय, इ. स. १८१७ - १८ मध्ये राजे आप्पासाहेब भोसले ( नागपूर ) यांनी गोंडव इतर आदिवासीच्या जमात प्रमुखांना एकत्र आणले. त्यांच्या मदतीने इंग्रजांशी लढा दिला. इंग्रजांनी त्यांच्याशी लढून अनेकांना पकडले. मात्र ते सुटून सातपुडा पर्वताच्या आश्रयाला राहिले. निकराचा लढा देऊन इंग्रजी सैन्याला त्यांनी धूळ चारली. मेळघाट, भैसंद, इत्यादी गावावर ताबाही केला. शेवटी ब्रिटिशांनी त्यांचा पराभव केला. याच वेळी रणजितसिंग व इतर संस्थानिकांना जागे करण्याचे प्रयत्न झाले पण अपयश आले. १५ जुलै १८४० मध्ये जोधपूरला गेल्यावर एकाकी अवस्थेत आप्पासाहेबांचा मृत्यू झाला. 

( ५ ) मराठवाड्यातील उठाव 

इ. स. १८१८ ते १८५२ च्या दरम्यान निजामी राजवटीविरुद्ध मराठवाड्यात अनेक उठाव झाले. बंजारी, हटकर, भिल्ल, देशमुख, देशपांडे, इत्यादींचे असंघटित उठाव झाले. बीड जिल्ह्यात धर्माजी प्रतापरावाचे बंड ( १८१८ ), हदगाव तालुक्यातील नौसाजी व हंसाजी नाईकाचे बंड ( १८१९ ), उदगीरच्या शिवलिंग देशमुखाचे बंड ( १८२० ), औरंगाबाद परिसरातील भिल्लांचे उठाव ( १८१९, १८२१, १८२२, १८२५, १८३५, १८३८, १८४१, १८४३ ), परभणी जिल्ह्यातील हिंगोलीच्या राजारामचे बंड ( १८३० ) व नांदापूरच्या कृष्णाजी देशमुखाचे बंड ( १८५२ ), नांदेड जिल्ह्यातील कंधारचा राजा हणमंतरावचे बंड ( १८४७ ), उस्मानाबाद जिल्ह्यातील लातूरचे देशमुख व शिराढोणचे देशपांडे यांचे बंड ( १८३२ ) इत्यादीच्या अभ्यासावरून स्पष्ट होते की इ. स. १८१८ ते १८५२ पर्यंतच्या बंडाळ्यांनी मराठवाडा व हैद्राबाद संस्थानच्या इतर भागातील स्वातंत्र्याचा संघर्ष टिकवून ठेवला. या लढ्याला त्यामुळे तेजस्वी स्वरूप प्राप्त झाले. 

( ६ ) इतर संस्थानातील उठाव 

खानदेशात-ल्या भिल्लांचा प्रतिकार मोडून भिल्लाप्रमाणे कोळ्यांनीही इंग्रज राजवटीविरुद्ध १८२८, १८३९ व १८४४ ते ४८ दरम्यान लढे दिले. नरसिंगराव दत्तात्रय पेटकर ऊर्फ निंबाजी नरसप्पा याने सातारच्या पदच्युत छत्रपती प्रतापसिंह यांना १८४१ साली त्यांची गादी मिळवून देण्यासाठी अरब व रोहिल्यांच्या मदतीने प्रयत्न केला, पण हा प्रयत्न असफल ठरला. कोल्हापूर संस्थानातही वेळोवेळी बंडे झाली. सावंतवाडीचे अल्पवयीन राजे साहेब आण्णासाहेब आणि त्यांचे पाठीराखे सरदार फोंड सावंत
यांनीही बंड पुकारून काही किल्ले काबीज केले नाशिकचे राघू भांग्रे व त्याचे बंधू यांनी नाशिक, नगर भागात इंग्रजांना भरपूर सतावले. सरकारने राघू भांग्रेला पकडण्याची शिकस्त केली. त्यासाठी रु. पाच हजाराचे बक्षिस घोषित केले. पैशाचा लोभ, आपसातील मतभेद व हेवेदावे यामुळे जसे इतरत्र घडते तसे इथेही घडले. राघू भांग्रे व बापू भांग्रे हे त्यांच्या जवळच्या माणसामुळे व नातेवाईकांमुळे पकडले गेले. इंग्रजांच्या जुलमाविरुद्ध भाऊ खेर, चिमणाजी जाधव व नाना दरबारे या पेशव्यांच्या चाकरांनीही पुढाकार घेऊन कोळी जमातीच्या लोकांना उठावास उद्युक्त केले होते. 

 ( आ ) १८५७ चा उठाव व महाराष्ट्र 

१८५७ च्या उठावाचा विस्तार उत्तर भारताएवढा दक्षिणेत झाला नाही. तरी हैद्राबाद राज्यात त्याचे बरेच दूरगामी परिणाम उमटले. १६ मे १८५७ रोजी नासिरउद्दौलाचा मृत्यू झाला. हैद्राबाद संस्थानची सत्ता पुत्र अफजल उद्दौलाकडे गेली. इंग्रज विरोधी या संस्थानातील पहिला उठाव औरंगाबाद येथे जून १८५७ मध्ये झाला. त्याचे दूरगामी परिणाम हैद्राबाद राज्यावर उमटले. इंग्रज अधिकाऱ्यांनी समजूत काढून उठाव करणाऱ्या फौजेला शांत करण्याचा प्रयत्न केला. कॅ. एबटने नगर व पुणे येथून सैनिकी मदत मागितली. फौजेत जमादार छेडा खान सैनिकांना प्रेरित करत होता. तो घोडेस्वारांच्या पहिल्या पलटणीत होता. हीच भूमिका दुसऱ्या पलटणीत उतरली. युरोपियन अधिकारी बायका - मुले यांची कत्तल होणार ही बता पसरली. बायका मुलांना अहमदनगरला पाठविण्यात आले व पायदळाच्या दोन तुकड्याही औरंगाबादेस आल्या. बंडखोरांना निःशस्त्र केले. तशाच दफादारमीर फिदा अलीने कॅ. अॅबटवर पिस्तूल झाडले पण नेम चुकला. फिदा अलीला फाशी देण्यात येऊन हैद्राबाद संस्थानातील १८५७ च्या उठावातील तो पहिला बळी ठरला. इतर २१ बंडखोरांना ठार मारण्यात आले. त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि इतर तिघांना तोफेच्या तोंडी देण्यात आले. औरंगाबादचा उठाव मोडण्यात आला. खुद हैद्राबाद येथे सामान्य नागरिक व शिपाई यांनी उठाव केला. नेता तुर्रेबाजखान मारला गेला. तरी तीन वर्ष अशांतता राहिली. अनेक बंडखोरांना ठार केले. काहींना कैद केले गेले. 
     उत्तरेप्रमाणे दक्षिणेत उठाव व्हावेत यासाठी तात्या टोपे व नानासाहेब धडपडत होते. दक्षिणेत बंडवाले व रोहिले यांनी उठाव केले. खालसा झालेल्या फौजेतील रोहिले यात उतरले. अजंठा, बसमत, लातूर, मखतल, निर्मल भागात उठाव झाले, ते एकत्रित झाले. इंग्रजांना ते मोडण्यासाठी दोन वर्ष लढावे लागले. भोगाजी नाईक या भिल्लाने अजंठा भागात बंड केले. वैजापूरचा प्रमुख जमीनदार गोविंद काशीराव देशपांडेने त्याला साथ दिली. भोगाजीसह ४० - ५० भिल्ल मारले गेले. इंग्रजांनाही बरेच नुकसान सोसावे लागले. तशातच रंगराव पागेने सत्ता उलथून टाकण्याचा कट रचला. तो कानपूरला नानासाहेबास
भेटला. 
      दक्षिणेत शिपाई, प्यादे, कुलकर्णी, पाटील, देशमुख देशपांडे व इतरांनी उठाव करावा या संदर्भाचा जाहीरनामाही त्याने आणला होता. नानाकडे गेलेला सोनानी पंडित वारल्यामुळे रंगरावकडे नेतृत्व आले. त्याने अनेकांशी संपर्क केला. त्यात कोसलचा राजा, सफदरउद्दौला, शेख मदार, रघुनाथराव, इत्यादी अनेक मंडळी होती. १८५९ मध्ये कट उघडकीस येऊन रंगरावला अटक झाली. सहकाऱ्यांनाही पकडण्यात आले. रंगराववर खटला चालवून त्यास जन्मठेप व इतरांनाही शिक्षा दिली गेली. अर्थात या देशातील जनतेने शंभर वर्ष लोटल्यावरही इंग्रजांना व त्यांच्या सत्तेला ग्राह्य धरले नव्हते. 
   एवढे झाले पण शांतता वरवरची होती. इंग्रज अधिकाऱ्यांवर हल्ले चालू होते. रावसाहेब पेशवे दक्षिणेत आले. तात्याच्या अनुयायांनी असंतोष वाढविला. सातारच्या छत्रपती घराण्याचे नाव सांगणाऱ्या अनेक व्यक्तींनी असंतोष वाढविला. स्वत : ला सातारचा छत्रपती म्हणविणारा एक गृहस्थ पैठणला राहिला होता. महाराजा प्रतापसिंगचा सेनापती बाळासाहेब याने बीडला १८५८ मध्ये भेट दिली होती. म्हणूनच १८५९ मध्ये सातारा छत्रपतीच्या वतीने बीडला उठाव झाला. १४ व्यक्तींवर खटले भरून त्यांना फाशीची शिक्षा झाली. कोल्हापूर नरगुंद भागात उठावाची थोडीफार हुल दिसते. 
    नागपूरजवळ कामठी व टाकली येथे कंपनीच्या फौजा होत्या. त्यातील काही मुसलमान शिपायांनी १३ जून १८५७ रोजी बंड पुकारले. नागपूर भोसले घराण्यातील राणी बाकाबाईचा पाठिंबा अपेक्षित होता. पण तो मिळाला नाही. शेवटी चार सूत्रधार इनायत तुल्लाखान, विलायतखान, नवाब कादरखान व दीदारखान यांना फाशीची शिक्षा झाली. भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यात बापूरावं व वेंकटराव या दोन जमीनदारांनी गोंड व रोहिले गोळा करून दोन वर्ष अशांतता टिकविली. म रंगो बापूजी गुप्ते सातारा गादीचे निष्ठावंत सेवक या उठावात उतरले. चिरंजीव सीतारामपंतही सोबत होते. 
     रंगो बापूंनी रामोशी, कोळी, मांग यांना गोळा करून फौज तयार केली. भोरचे सचिव चिमणाजींनी रघुनाथ यांच्याबरोबर उठाव केला. पण नंतर ते मागे सरले. पंत सचिवांनी सिंदकर या कायस्थ प्रभू ब्राह्मणाकरवी रंगो बापूंना कंपनीस पकडून देऊन विश्वासघात केला. नानासाहेब, तात्या टोपे, झाशीची राणी, इत्यादीच्या प्रेरणेने महाराष्ट्रात असे काही पडसाद उमटलेले दिसतात. 

No comments:

Post a comment